न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- पीएमआरडीए अंतर्गत घरकूल योजनेतील एकूण १९ हजार ११२ लाभार्थ्यांपैकी २ हजार ५४६ जणांना २५ कोटी ४६ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.
पीएमआरडीएच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील वैयक्तिक घरकूल बांधण्यास केंद्र व राज्य सरकारची प्रथम टप्प्यात १३८४१, दुसऱ्या टप्प्यात ५२७१ लाभार्थ्यांच्या अहवालास ३१ मार्च २०२२ रोजी मंजुरी मिळाली आहे. प्राधिकरणाने या घटकाची अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. सल्लागाराने आजपर्यंत एकूण १९ हजार ११२ लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालावर कार्यवाही केली आहे. त्यानुसार आजपर्यंत १० हजार ८६० लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत.
त्यातील १ हजार ८३६ लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरु केले आहे. तर १५५२ जणांना पहिल्या तर ९९४ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे प्रत्येकी एक लाख याप्रमाणे वितरित केले आहे. तसेच ८२ जणांना शेवटच्या हप्त्याचे ५० हजार प्रमाणे अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, केंद्र शासनाने मार्च २०२२ पासून नवीन डीपीआर मंजुरीस पाठविण्यास मनाई केली आहे.
आता प्राधिकरणामार्फत www.pmaypmrda.in या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. त्यामध्ये सर्व तालुक्यातील मंजुरी प्राप्त एकूण १९११२ लाभार्थ्यांची तालुकानिहाय प्रकल्प अहवालाची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच सद्य:स्थितीत सर्व तालुक्यात मिळून १०८३६ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश वितरित केलेल्या लाभार्थ्यांची यादी www.pmrda.gov.in www.pmaypmrda.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामुळे दूरच्या लाभार्थ्यांना आपल्या अर्जाबाबत माहितीसाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे


















