न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाबाबत अनेक वाद-विवाद झाले. सत्ताधारी पक्षातच उभी फुट पडली. अनेक भेटीगाठी, पत्रकार परिषदा घेतल्या. भाजपचेच बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी बंडखोर म्हणून स्थायी सभापतीपदासाठी अर्ज भरला.
त्यात विरोधी पक्ष शिवसेना-राष्ट्रवादी यांनी उडी घेतली व शीतल शिंदेना पाठींबा जाहीर केला. एवढे सर्व नाराजीनाट्य घडवून आणले. अखेर आज झालेल्या स्थायीच्या निवडणुकीत बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी अखेर रणांगणातून माघार घेतली. भाजपने आपल्या सदस्यांची मते फुटू नयेत यासाठी व्हीप बजावला होता. परंतु, शीतल शिंदे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली.
स्थायी समिती सभापती पदाच्या आज गुरुवार (दि. ७) रोजी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास मडेगिरी यांचा अपेक्षित संख्याबळानुसार विजय झाला आहे. शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी युतीचा धर्म पाळत मडेगिरींना मतदान केले. मडेगिरी यांना १६ पैकी १२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या मयुर कलाटे यांना अवघ्या ४ मतांवर समाधान मानावे लागले.