न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- भोसरीतील प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान, दहा बाय बारा फूट मापाच्या त्यांच्या सुस्थितीत असणाऱ्या खोल्या. मुक्त वातावरण परंतु, त्याचबरोबर तिथे प्रकर्षाने दिसून आली ती सामाजिक “दृष्टीची”अनास्था. या विषमतेच्या वातावरणातही स्वतःच्या अस्तित्वासाठी व स्वपायावर धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी उचलणारे भोसरी येथील ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय मोलाची कामगिरी करीत आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती तसेच जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवड शहरच्या पदाधिकारी यांनी प्रकाशालयास भेट दिली आणि त्याठिकाणी प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांच्याशी चर्चा करीत असताना छोट्या छोट्या जीवनाआवश्यक वस्तूंसाठीसुद्धा त्यांना प्रयत्नशील रहावे लागते हे समजले. दोन वेळच्या जेवणासाठी असणारा धान्याचा साठा सुद्धा संपलेला दिसून आला. त्यामुळे तात्काळ दोनही संस्थांनी “एक मुटठी अनाज” उपक्रम राबविला. त्यासाठी १०१ गृहिणींनी पाठिंबा दर्शविला.
जैन सोशल ग्रुपच्या महिलांनी सदरच्या उपक्रमास २०० किलो तांदूळ, गहू तसेच कडधान्ये आणि डाळही जमा केले ते आज रोजी प्रकाशालयाचे संचालक पंकज कुलकर्णी सर यांचेकडे सुपूर्त करण्यात आले. प्रसंगी प्रमुख उपस्थिती समिती अध्यक्ष विजय पाटील, संतोष चव्हाण, अमित डांगे जैन सोशल ग्रुपचे संतोष छाजेड, विजय मुनोत, राजेंद्र कटारिया, विजय नहार यांची होती.
या प्रसंगी विजय मुनोत म्हणाले, “समाजातील सर्व थरातील नागरिकांनी एकत्रीतपणे वंचित घटाकातील आपल्या बांधवानां मदत देणे आवश्यक आहे. ह्याच संकल्पनेतून “एक मूटठी अनाज” उपक्रम आपल्या पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त रहिवास्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे मी दोनही संस्थांच्या वतीने आवाहन करतो.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” पिंपरी चिंचवड शहरात प्रज्ञाचक्षु विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या समस्यांची यादीही मोठी आहे. याकरीता शहरातील १०१ महिलांनी “एक मुटठी अनाज” हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. जास्तीत जास्त रहिवास्यानी यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी दोनही संस्थांनी पुढाकार घेतला आहे.”











