- कोयता आणि तलवार बाळगणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- पुण्यातील सिंहगड रोड परिसरात कोयता हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवत जोरदार धुलाई केल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यामुळे कोयत्यासारखे धारदार शस्र जवळ बाळगणारे गुन्हेगार धास्ती घेतील, अशी शक्यता होती. परंतु ही शक्यता फोल ठरल्याचे दिसते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी, निगडी आणि आळंदी परिसरात पोलिसांनी कोयता आणि तलवार जवळ बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात भारतीय आणि महाराष्ट्र पोलीस हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना निगडीतील अजंठानगर येथील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड पंपाच्या मागील बाजुस (दि. २९) रोजी रात्री १०.१५ वा. चे सुमारास घडली. निगडी पोलिसांनी रोहित अश्रुबा आव्हाड (वय २३ वर्षे, रा- सी.एन.जी. पंपासमोर दुर्गानगर, निगडी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून १०० रुपयांचा लोखंडी कोयता जप्त केला आहे.
दुसरी घटना (दि. ३०) रोजी रात्री ९.३० वा. चे सुमारास केळगाव येथील हनुमानवाडी रोडवर ता. खेड येथे घडली. आळंदी पोलिसांनी विनोद संभाजी भिसे (वय २९ वर्षे, रा. केळगांव हनुमानवाडी ता.खेड जि.पुणे) याला ताब्यात घेतले आहे. आळंदी पोलिसांनी आरोपीकडून बेकायदेशीररित्या जवळ बाळगलेली दोन हजार रुपयांची तलवार जप्त केली आहे.
तिसरी घटना पिंपळे गुरव येथील पेट्रोल पंपाच्या समोरील मोकळ्या जागेत (दि. २९/११/२०२२) रोजी रात्री १०.०० वा. चे सुमारास घडली. सांगवी पोलिसांनी आरोपी मंगेश बापू लोखंडे (वय २५ वर्षे, रा. बापूजी बुवा मंदिर जवळ, वैदुवस्ती, पिंपळे गुरव) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १०० रुपयांचा लोखंडी कोयता जप्त केला आहे.


















