न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२२) :- थेरगाव, संचेती शैक्षणिक संस्थेत तीन वर्षानंतर वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन अतिशय उत्साहात करण्यात आले. शालेय शिक्षणासह शारीरिक शिक्षणाचीही विद्यार्थ्यांना तितकीच गरज आहे. क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थी शालेय दशेत एकोपा, बंधुता, समता अशा मूल्यांना आत्मसात करतात. त्यामुळे दरवर्षी विद्यालयामार्फत तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे ऑलम्पियन बाळकृष्ण अकोटकर यांनी विद्यार्थ्यांच्या खेलवृत्तीला पाहून त्यांच्या खेळाचे/उपक्रमाचे कौतुक केले. संचेती शैक्षणिक संकुलाचे कार्य लक्षात घेता याच शाळेतील काही विद्यार्थी भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत धडक मारू शकतील, असे ते म्हणाले.
संस्थेच्या सचिव श्रीमती वर्षा किशोर टाटीया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थी घडविण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलात्मक गुणांना महत्व दिले पाहिजे. त्यांच्यातील सुप्त गुणांना आपण ओळखले पाहिजे, त्यांच्याकडे भारताचे भविष्य म्हणून आपण पाहतो. विद्यार्थ्याना मूलभूत कला-क्रीडा शिक्षण व ज्ञान देण्याचे काम संस्था अविरत करीत असते.
कार्यक्रमास दीपक कन्हेरे पर्यवेक्षक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सुरेखा बिरादार, इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य अभ्रा रे, विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्रीधर गायकवाड, रणजीत पोटे यांनी कार्यक्रमांचे व खेळांचे नियोजन केले. तसेच संकुलातील विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षेकेत्तर यांची क्रीडा महोत्सव पार पाडण्यास मोलाची साथ लाभली. पालकांनी स्पर्धेमध्ये उस्फुर्तेने सहभाग घेऊन मनसोक्त आनंद घेतला.