न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२३) :- पेरणेफाटा येथील विजय स्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक दाखल होतात. त्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
चाकण- शिक्रापूर मार्गासह इतर मार्गावरून अभिवादनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जयस्तंभ अभिवादनानिमित्त पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून रविवारी मध्यरात्रीपर्यंत या विभागात बदल केले आहेत.
चाकण, म्हाळुंगे, दिघी-आळंदी, देहुरोड, तळेगाव, भोसरी वाहतूक विभागअंतर्गत येणाऱ्या व जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसेस, जड, हलकी वाहने / माल वाहतूक टेम्पो /ट्रक वाहनांकरीता वाहतुकीत बदल केला आहे. १ जानेवारी २०२३ रोजी रात्री बारापर्यंत वाहतुकीत बदल केला आहे.
या दरम्यान मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यात दोन उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, नऊ पोलिस निरीक्षक, २४ सहायक / उपनिरीक्षक, २४२ अमलदार आणि ५७ वार्डन असा बंदोबस्त राहणार आहे.















