कोरोना काळात शाळा बंद असताना पालकांकडून फी व दंडाची केली वसूली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- कोरोना काळात शाळा पूर्ण बंद असतांनाही पूर्ण फी व दंड वसूल करणाऱ्या त्रिवेणीनगर येथील सेंट अॅन्स स्कूलची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिवसेना भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात यांनी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्याकडे सेंट अॅन्स स्कूलबाबत तक्रार केली होती. कोरोना काळात शाळा पूर्ण बंद असतांनाही पूर्ण फी व दंड वसूल करणाऱ्या त्रिवेणीनगर येथील सेंट अॅन्स स्कूलबाबत सुनावणी घेऊन कारवाई करुन या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालक उकिरडे यांनी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना या शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोरोना कालावधीत शाळा पूर्णपणे बंद होत्या. तरीही सेंट अॅन्स स्कूल प्रशासनाने साक्षी थोरात आणि हर्षदा सोमल या विद्यार्थिनीकडून पूर्ण फी व दंड वसूल केला होता. याबाबत रावसाहेब थोरात यांनी पुराव्यासह शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी या शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोरोना काळात शाळा पूर्ण बंद होत्या. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सुनंदा वखारे यांनी पत्राद्वारे फीमध्ये १५ टक्के सवलत देण्याचे आदेश शाळेला दिले होते. मात्र, शाळा प्रशासनाने मनमानी करीत या आदेशाकडे दुर्लक्ष केले. कोरोना काळातील पूर्ण फी घेत दोन वर्षांचा १२ हजार रुपये दंडही वसूल केला. विद्यार्थी आणि पालकांवर मोठा अन्याय होता. या शाळेबाबत पालकांच्या असंख्य तक्रारी आहेत. शाळेची निःपक्ष चौकशी करून कायदेशीर करावी करावी.
– रावसाहेब थोरात, शहर संघटक, शिवसेना…















