न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- गोवरचा वाढता विळखा पाहता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरणावर भर दिला आहे. नुकतेच लसीकरण एक्स्प्रेस असे प्रायोगिक तत्वावर वाहन सुरू करण्यात आले आहे. या वाहनांद्वारे शहरातील लसीकरण न झालेल्या बालकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे.
लहान बालकांना गोवरचा विळखा पडत आहे. शहरात कुदळवाडी, थेरगाव आदीसह विविध ठिकाणी ४७० संशयित रुग्ण आढळले आहेत. या पैकी ३५ बालकांना गोवर झाला असल्याचे स्पष्ट निदान झाले आहे. ही आकडेवारी पाहता महापालिकेच्या वतीने सर्व्हेक्षण आणि लसीकरणावर भर दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अद्यापपर्यंत ३ लाख ४३ हजार ७८५ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. ७४ हजार पेक्षा अधिक पाच वर्षांपेक्षा खालील बालकांचा सर्व्हे करण्यात आला आहे.सर्व्हेक्षणाबरोबरच पालिकेच्या वतीने आता लसीकरणावर देखील भर दिला आहे. ३५ हजार ४२ बालकांना आतापर्यंत व्हिटॅमिन ए ची मात्रा देण्यात आली आहे. ३ हजार ७८८ बालकांना गोवर स्वलाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. हे लसीकरण सुरू असताना प्रायोगित तत्तावर स्वतंत्र वाहनाची सोय करण्यात आली आहे. लसीकरण एक्स्प्रेस या नावाने फिरते लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी हे वाहन उभे केले जात आहे. लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण केले जात आहे. यासाठी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकारात्मक प्रतिसाद दिसू लागल्यास वाहनांमध्ये वाढ होणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर आपण लसीकरणासाठी एका वाहनाची सोय केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास त्यामध्ये आणखीन वाढ करणार आहोत. सध्या जिथे आवश्यकता असेल तिथे या वाहनाद्वारे लसीकरण करत आहे. – डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी…


















