- उन्नती सोशल फाउंडेशनकडून सोसायटीतील नागरिकांना २०२३ झाडांचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- शहराचा विकास झपाट्याने होत असून टोलेजंग इमारती बांधण्यासाठी सरार्स झाडांची कत्तल (Slaughter of trees) केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याची जाणीव ठेवून उन्नती सोशल फाउंडेशन नववर्षानिमित्त दरवर्षी ” एक झाड लावूया; एक झाड जगवूया ” असा संकल्प करीत सलग ५ वर्षांपासून मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आयोजित करीत आहे.
पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांना नव्या वर्षाच्या सालाप्रमाणे २०२३ झाडांचे फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे आणि उद्योजक संजयशेठ भिसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जैसवाल, विकास काटे, अल्कोवे सोसायटीचे अध्यक्ष विजय भांगरे, वाल्मिक काटे व सोसायटीतील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत माहिती देताना कुंदाताई भिसे म्हणाल्या, दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चार जणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. त्यामुळेच दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत आम्ही पिंपळे सौदागरकर वृक्ष वाटपाच्या माध्यमातून करतो आहोत. रविवार (दि. १) रोजी शिवार चौक आणि पी.सी.एम.सी ग्राऊंड येथे नागरिकांना वृक्षांचे वाटप केले. रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती देखील आम्ही उन्नती सोशल फाउंडेशनद्वारे करीत आहोत.
















