दोन सुवर्ण आणि एका ब्रॉन्झ पदकाची कमाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- नाशिक येथील ओपन ८ ए साईड नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा २६ ते २८ डिसेंबर दरम्यान मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे पार पडल्या. या स्पर्धत २० संघ आणि २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ११, १४ आणि १६ वर्षाखालील गटात चमकदार कामगिरी करीत दोन सुवर्ण आणि एक ब्रॉन्झ पदकाची कमाई केली.
११ वर्षाखालील विद्यार्थी गटाच्या फुटबॉल संघाकडून नक्षत्र पाटील याने ९ गोल आणि सुयश वैद्य याने ७ गोल अशी लक्षवेधी कामगिरी करीत सुवर्ण पदकाची कमाई करत पहिले स्थान पटकाविले. १४ वर्षाखालील गटात फुटबॉल संघाने ब्रॉन्झ पदक मिळवले. आर्यन फटांगरे, कोविद आमेटा आयुष पारखे आणि सोहम चिरमाडे यांनी आपल्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली. याच मैदानावर झालेल्या १६ वर्षाखालील बास्केटबॉल स्पर्धत स्कूलने सुवर्णपदक प्राप्त केले. आगम धाडीवाल, सोहम चिरमाडे आणि आयुष पारखे यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.
या दैदिप्यमान कामगिरीबद्दल शाळेचे संस्थापक, अध्यक्ष संदीप काटे, उपाध्यक्ष अनिताताई काटे यांनी शाळेच्या गुणवंत खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक राहुल तिवारी यांचे विशेष कौतुक केले.