न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शेवटपर्यंत करत राहिले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी साडेपाच वाजता पिंपळे गुरव गावठाण येथील मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय मंडळींसह अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
निधनानंतर त्यांचे पार्थिव पिंपळेगुरव येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या सभापती डॉ. निलम गोऱ्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी आमदार विलास लांडे महापालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौंबे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आदींसह शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले.
सायंकाळी फुलांनी सजविलेल्या गाडीतून पिंपळेगुरव येथील निवासस्थान ते गावठाणातील मैदानापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीन फैरी झाडत पोलिसांनी त्यांना सलामी दिली.
पिंपरी-चिंचवडमधील सर्वाधिक विकसित मतदारसंघ म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे या मतदारसंघाची ही ओळख निर्माण झाली होती. लक्ष्मण जगताप या मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झाले होते. तसेच विधानसभेचे आमदार होण्यापूर्वी ते विधान परिषदेवर निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीतील विजयानंतर वर्षभरातच त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. तरीही त्यांनी कोरोना संकट काळात स्वतःपेक्षा नागरिकांना मदत करण्यात धन्यता मानली होती.
















