न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- परिवहन विभागात सध्या लायसन्स स्मार्ट कार्डचा तुटवडा जाणवत आहे. पिंपरी- चिंचवड शहरतही तुटवडा पडला असून, ट्रान्सपोर्ट आणि टुरिस्ट टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना पर्मनंट लायसन्स टेस्टसाठी वेळच दिली जात नाही. तर काही प्रमाणात खासगी लायसन्स मिळवण्यासाठी सुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिवहन विभागाने दोन कंपन्यांना स्मार्ट कार्ड पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. त्यापैकी एका कंपनीकडून स्मार्ट कार्डचा अपुरा पुरवठा असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अनेक नागरिक आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करतात. मात्र, स्मार्ट कार्डच्या तुटवड्यामुळे त्यांना ड्रायव्हिंग टेस्टची वेळ सुद्धा दिली जात नाही. गेल्या एक महिन्यापासून ही समस्या भेडसावत आहे. ट्रान्सपोर्ट आणि टुरिस्ट टॅक्सी चालकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. लायसन्सचे स्मार्ट कार्ड पुरवण्यासाठी दोन कंपन्यांना काम देण्यात आले आहे. एका कंपनीला २४ तर दुसऱ्या कंपनीला २६ आरटीओ कार्यालयातील काम देण्यात आले आहे. त्यापैकी एका कंपनीकडून पुरवठा कमी केला जात असल्याने काही दिवसांपासून काही ठिकाणी स्मार्ट कार्डची समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात पुरवठादार कंपनीला सूचना केल्या असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.















