- ठीक-ठिकाणी कोपरा सभेचे आयोजन; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- वाढलेली महागाई, तरुणांच्या हाताला नसणारे रोजगार, केंद्र, राज्य आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचा वाढलेला भ्रष्ट्राचार, भाजपा नेत्यांकडून थोर पुरुषांविषयी वारंवार केली जाणारी अपमानजनक वक्तव्य, आधीच बरोजगारी वाढली असताना महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग-धंदे, शहरात वाढलेली गुन्हेगारी या ज्वलंत विषयावर जनतेत जागृती निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात जन जागर यात्रा सुरु आहे. ही जागर यात्रा गुरुवारी (दि. ५) रोजी पिंपरी चिंचवड शहरात दाखल होत आहे. शहर राष्ट्रवादीने जन जागर कोपरा सभेचे आयोजन केले आहे.
या जन जागर यात्रेत डिलक्स चौक, पिंपरी येथे दुपारी ३:०० वाजता, खंडोबा माळ, आकुर्डी येथे सायंकाळी ४:३० वाजता, गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर येथे ६:०० वाजता कोपरा सभा आयोजित केल्या असून, शहरातील जनजागर यात्रेचा समारोप सभा पी.एम.टी. चौक, भोसरी येथे सायंकाळी ८.०० वाजता होणार आहे.
या जन जागर यात्रेसाठी खास LED रथ तयार केला असून भाषणांसाठी स्वतंत्र रथ नियोजित केला आहे. या जन जागर यात्रेसाठी खा. सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष विद्या चव्हाण, खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, प्रदेश निरीक्षक तथा आशा मिरगे, वैशाली नागवडे, शितल हगवणे यासह शहरातील पक्षाचे वरीष्ठ नेते, माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, माजी नगरसेवक, नगरसेविका व सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी आप आपल्या भागात या जन जागर यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन अजित गव्हाणे यांनी केले आहे.















