न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- संचेती हॉस्पिटल, भारतीय जैन संघटना (बीजेएस) व चांदमल मुनोत ट्रस्ट,यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान पुण्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन युएसएमधील प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ.लॅरी वाईनस्टाईन यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती, युएसए येथील प्लास्टिक सर्जन डॉ.बॅरी सिट्रॉन, चेस्टर सर्जरी सेंटर,युएसएच्या संचालिका डॉ.लिंडा पॅटरसन,प्लास्टिक व हँड सर्जन डॉ.लॉरेन्स ब्रेनर,प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजक शशिकांत मुनोत,संचेती हॉस्पिटल चे महाव्यवस्थापक राहुल चौबे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ,टाळू (क्लेफ्ट लिप व पॅलेट) ,नाक,भुवया,कानासंदर्भात विकृती यासारख्या समस्यांवरील उपचारांचा समावेश असून प्लास्टिक सर्जरी तंत्राचा वापर करून उपचार केले जातील.या शिबिरासाठी एकूण ५०० हून अधिक रूग्णांनी नोंदणी केली असून जवळपास २०० वंचित रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
युएसएमधील प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ.लॅरी वाईनस्टाईन म्हणाले की, डॉ.दीक्षित यांनी आयुष्यभर दिव्यांगांची सेवा केली,त्यामुळे त्यांचे जीवन यशस्वी झाले. डॉ.दीक्षित जरी आपल्या सोबत नसले तरी त्यांनी सुरू केलेली ही मानवतेची सेवा थांबणार नाही. गेल्या २९ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचा फायदा केवळ पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू लोकांना झाला आहे.
आपल्या स्वागतपर भाषणात संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती म्हणाले की,मोफत प्लास्टिक शिबिराची सुरूवात कै.डॉ.शरदकुमार दीक्षित यांनी सुरू केली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक शिबिरे आयोजित केली.हा वारसा या शिबिराच्या माध्यमातून डॉ. लॅरी वाईनस्टाईन आणि त्यांच्या टीमने सुरू ठेवला आहे.मोफत प्लास्टिक शिबिरे ही लोकांकरिता मदतगार ठरली असून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे.
ते पुढे म्हणाले की, बीजेएसचे कार्य हे कौतुकास्पद आहे. डॉ.के.एच.संचेती आणि शांतीलाल मुथा यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, हे दोघेही आमच्यासाठी प्रेरणास्थान व मार्गदर्शक शक्ती आहेत.
चेस्टर सर्जरी सेंटर, युएसएच्या संचालिका डॉ. लिंडा पॅटरसन म्हणाल्या की, मानवतेच्या सेवेच्या माध्यमातून डॉ.दीक्षित यांनी समाजातील लोकांना आनंद दिला. त्या पुढे म्हणाल्या की,आपण इतरांचा विचार केला पाहिजे. आपल्याला शक्य तेवढी सेवा केली पाहिजे.