न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत शुक्रवारी (दि. ६) रोजी एक नागरिक बॅगेमध्ये भरून १५ लाख रूपयांची रोकड घेऊन आला होता. हा व्यक्ती रोकड घेऊन महापालिकेत प्रवेश करत असतानाच सुरक्षा रक्षकांनी बॅग तपासणीसाठी मशीनमध्ये (स्कॅनर) ठेवण्यास सांगितले. तपासणी दरम्यान बँगेत मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली होती.
या बँगेत १५ लाख रूपयांची रोकड असतानाही त्यामध्ये केवळ ३ ते ४ लाख रुपयेच होते, असे सांगत सुरक्षा विभागाने सारवासारव केल्याने संशयात आणखीनच भर पडली आहे.
शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक व्यक्ती महापालिकेत बॅग घेऊन आली होती. पालिकेच्या प्रवेशव्दारावरच सुरक्षा रक्षकाने संबंधित व्यक्तीला तपासणी मशीनमध्ये (स्कॅनर) बॅग ठेवण्यास सांगितले. त्यामुळे ती व्यक्ती काहीशी घाबरली. स्कॅनरमध्ये बॅग ठेवताच त्यामध्ये रोकड असल्याचे निदर्शास आले. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून घेत बँगेतील पैशांची माहिती दिली. वरिष्ठांनी संबंधित व्यक्तीकडे पैशांची चौकशी करून सोडून दिले. मात्र याबाबत उलट-सुलट चर्चा रंगली.
दरम्यान संबंधित व्यक्तीला सुरक्षा अधिकाऱ्यांनी बोलावून घेत अधिक चौकशी केली. या चौकशीत संबंधित व्यक्ती विभागात काही कामासाठी आली होती. त्याने बँकेतून साडेतीन लाख रूपये काढले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ते पैसे कारमध्ये न ठेवता बरोबर घेऊन पालिकेत आणले होते. सुरक्षा विभागाने त्वरीत संबंधित व्यक्तीला पैसे परत ठेवून पालिकेत येण्यास सांगितल्याची माहिती सुरक्षा विभाग प्रमुख उदय जरांडे यांनी दिली.


















