न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च) :- रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांच्या विविध मागण्या आणि समस्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. राज्यात ५५ हजार रास्तभाव धान्य दुकान व हॉकर्स, किरकोळ केरोसीन परवानाधारक आहेत. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशन’ ही संपूर्ण राज्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांची जिल्हा, शहर, तालुक्यांतील परवानाधारकांची संघटनेचे नेतृत्व करणारी एकमेव नोंदणीकृत फेडरेशन असून, त्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणीचे निवारण फेडरेशन करते.
गेल्या अनेक वर्षापासून फेडरेशनच्या विविध प्रलंबित मागण्यांचा विचार झालेला नाही. ज्यात केंद्रीय अन्नसुरक्षा कायद्यान्वये गहू, तांदूळ फक्त बीपीएल अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणारी लेव्ही साखरेच्या कोट्याचा व्दारपोच योजनेत समाविष्ट करावा. हमाली (उतराई भराई मुक्त) यांची अंमलबजावणी त्वरीत व्हावी, राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे, सर्व रास्तभावधान्य दुकान आणि हॉकर्स किरकोळ केरोसीन परवानाधारकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अंमलबजावणी करावी आदी मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. यासाठी फेडरेशनने वेळोवेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु, कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
याबाबत ‘ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशन’ च्या वतीने नुकतेच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांना स्मरणपत्र पाठविले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ”आपणास दि. १३/०२/२०१९ रोजी राज्य फेडरेशनचे शिष्टमंडळ प्रत्यक्षात भेट घेऊन, मागण्याचे निवेदन सादर केले असता, निवेदनात नमूद असलेल्या सर्व विषयावर सविस्तर चर्चेअंती राज्य फेडरेशने मा. मुख्यमंत्री यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. यावेळी आपण येत्या लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर भेटीची वेळ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजतागायत आपल्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. याकरिता या पत्राद्वारे आपणांस कळवित आहोत की, संपूर्ण राज्यातील सर्व परवानाधारक तसेच लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी मिळून सध्या अस्तित्वात असलेल्या शासनास कोणीही मतदान न करता मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. राज्य फेडरेशनने राज्यातील सर्व परवानाधारक तसेच लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी आपण आमच्या मागण्यांची दखल घ्याल, असे या पत्रात म्हटले आहे.
या पत्रावर ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशन’ चे अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर, फेडरेशनचे उपाध्यक्ष, जन. सेक्रेटरी, खजिनदार विजय गुप्ता आदींच्या सह्या आहेत.











