- महापालिका आयुक्त तथा प्रशासकांकडून मंजुरीची मोहोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे ८५० बेडचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यात येणार होते. मात्र, चिखलीऐवजी मोशीतील गायरान जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २१५ कोटींऐवजी ४५० कोटी इतक्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. १०) सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली.
शहरातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी चिखली येथील गट क्रमांक १६५३ येथील आरक्षण क्रमांक १/८८ या भूखंडावर हे रुग्णालय बांधण्यात येणार होते. त्याला सर्वसाधारण सभेने २० जानेवारी २०२१ ला मंजुरी दिली होती. त्यानुसार, पालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस- विभागामार्फत सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक १ चिखली येथील गट क्रमांक १६५३ व १६५४ (गायरान) मधील आरक्षणावर ८५० बेडचे रुग्णालय विकसित करण्यासाठी २१५ कोटी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. रुग्णालयासाठी १० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, ती जागा वनक्षेत्रात असल्याने तो भूखंड देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. ती जागा रद्द करून मोशी येथील गट क्रमांक ६४६ मधील गायरान जागेचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ताब्यात आलेल्या ६ हेक्टर जागेत रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे. खर्चासाठी २१५ कोटी रक्कम कमी पडत असल्याने ती वाढवून ४५० कोटी करण्यात आली आहे. त्या निधीस सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता आयुक्त सिंह यांनी दिली. रुग्णालयाच्या कामासाठी कोटेशन प्रक्रिया राबवून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व आर्किटेक्ट म्हणून बेरी बिल्टस्पेस डिझाईन प्रा. लि. यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी सर्वेक्षण करून कामांचे अंदाजपत्रक तयार केले. त्याप्रमाणे आयुक्तांच्या मान्यतेने हा बदल करण्यात आला.


















