- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- युवकांनी एकमेकांना मदत करत सकारात्मक विचारसरणीचा अंगीकार करत,आपला समाज व राष्ट्र विकासात आपण काय योगदान देऊ शकतो याचा विचार करत स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्यावर भर द्यायला हवा, असे मत प्रसिद्ध व्याख्यात्या प्रियाताई जोग यांनी व्यक्त केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी शाखा पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा दिन निमित्ताने,स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “स्वामीजींच्या स्वप्नातील युवक व आजचा युवक” या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्यापुढे म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांचे जीवन चरित्र व त्यांची शिकवण याविषयीचे साहित्य वाचल्यास निश्चितच युवकांना स्वतःमधील अमर्याद क्षमतांची जाणीव होण्यास मदत होईल,त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने अधिकाधिक उत्तम काय करू शकतो याबाबतही प्रत्येकाला विचारांची दिशा स्पष्ट होईल.तसेच व्यक्ती निर्माणद्वारेच राष्ट्र निर्माण होत असते असे प्रियाताई जोग यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे व प्रियाताई जोग यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे ग्रंथपाल पवन शर्मा यांनी केले. तर सूत्रसंचलन स्नेहा सुतार व आभार प्रदर्शन वैष्णवी गुजर यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेच्या एमबीए व एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग व अन्य कर्मचारी तसेच विवेकानंद केंद्र कन्याकुमारी चिंचवड शाखेच्या केंद्रप्रमुख अरुणाताई मराठे उपस्थित होत्या.