- ” पीसीएमसी १०० भ्रष्टाचार की एक बात ”…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी डेंग्यूने अनेकांचे प्राण जातात. त्यातील काही कारणांपैकी एक धुरीकरणाची योग्य अमलबजावणी न करणे हे एक आहे. जगात “एडीस” जातीच्या डासांवर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी औष्णिक धुरीकरणाचा मोठा उपयोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अळीनाशक पायरोसीन ऑईल, टेमिफॉस, डेल्टामेथ्रीन, केओथ्रीन कीटकनाशके वापरून औष्णिक धुरीकरण करून ह्या रोगांवर मोठ्या प्रमाणात आळा घातला येतो. परंतु, महापालिकेतील भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष केवळ मलई कशी प्राप्त होईल याकडेच अधिक आहे.
पालिकेच्या “ड” क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औष्णिक धुरीकरण करण्याकरिता रिक्षा, टेम्पो भाड्याने घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध करून दर मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या एकूण तीन निविदांमधून मे श्री जगन्नाथ महिला स्वयंरोजगार सेवा सह संस्था मर्यादित यांची निविदा प्रति दिन प्रति रिक्षा ५९० दराने निश्चित केली गेली. कार्यादेश क्रमांक १६८, दिनांक ३०/०४/२०१५ प्रति दिन तीन टेम्पो उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात आले. या कामाचे ठेकेदारास २,२४८३१ रुपये अदा केले गेले. कोणत्याही प्रकारचा वाहन संदर्भातील विमा, फिटनेस, पासिंग कागदपत्रे न तपासता व जमा करता धुरीकरणासाठी फक्त एकच टेम्पो (MH14DM 3853) वापरल्याचे कागदपत्रात स्पष्ट झाले. उरलेल्या दोन वाहनांची फक्त कागदावर बोगस पद्धतीने नोंद केल्याचे दिसून आले. म्हणजेच औष्णिक धुरीकरण फक्त कागदावरच दाखवले गेले. प्रत्यक्षात औषधे न वापरता धुरीकरण केले नसल्याचे स्पष्ट झाले. बिले जमा करून रक्कम प्राप्त केली गेली.
डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत वाहनांचे भाडे देताना वाहन क्रमांक (MH14 AS 4879) हे वाहन प्रति दिन दोन वेळा पुरवले गेल्याचे अहवालात सादर केले गेले. एका वाहनाची दोन वेळा नोंद करुन भाडे उकळले गेले. प्रति दिन ३०० याप्रमाणे १८६०० रुपये ठेकेदारास जास्त दिले गेल्याचे दिसून आले. अशा खाबुगीरीने शहरात डेंग्यू, मलेरियावर नियंत्रण मिळवता येईल का? कर भरूनही भ्रष्ट कारभाराची झळ नागरिकांना बसत असेल, आरोग्याची हानी होत असेल तर महापालिका प्रशासनाला डोक्यावर घेणे कितपत योग्य आहे? असा सवाल प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी ” पीसीएमसी १०० भ्रष्टाचार की एक बात ” या सदरात प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.


















