- उच्चदाब तारा व टॉवर हटविण्यासाठी महापारेषणला रक्कम देण्यास मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेलच्या रहिवाशांसाठी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर सुमारे २ किलोमीटर अंतर लांबीचा पूल उभारण्यात येत आहे. पुलास अडथळा ठरणाऱ्या खडकीकडील बाजूच्या उच्चदाब तारा व टॉवर हटविण्यासाठी महापारेषण कंपनीला पालिका एकूण २७ लाख रुपये खर्च देणार आहे.
या पुलाचे काम वेगात सुरू आहे. सध्या पालिका हद्दीबाहेरील खडकीकडील काम सुरू आहे. पुलाच्या कामात तेथील अती उच्चदाब तारा व टॉवर अडथळा ठरत आहेत. ते हटविण्यासाठी संरक्षण विभागाने महापारेषण कंपनीला परवानगी दिली आहे. महापारेषण कंपनीने सुरक्षा ठेव म्हणून २५ लाख १८ हजार ३८२ रुपये पालिकेकडे मागितले आहेत. काम झाल्यावर ती रक्कम परत केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वार्षिक भाडेपट्टी म्हणून १ लाख ५८ हजार २७४ आणि परवाना शुल्क म्हणून २ हजार ५५७ रुपये अदा करावे लागणार आहे. हे भाडेपट्टी शुल्क पालिका ३० वर्षे अदा करणार आहे, असे एकूण २७ लाख खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.


















