- पिंपरी चिंचवड शहरात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित जनजागृती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- केंद्रीय रस्ता दळणवळण व महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार देशात विविध ठिकाणी ३२ वा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, निगडी वाहतूक विभाग व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह (दि ११ ते दि. १७) दरम्यान रस्ता सुरक्षेबाबत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाहनचालकांना या सप्ताहाच्या माध्यमातून प्रमुख चौकांमध्ये रस्ता सुरक्षेचे महत्व प्रबोधनात्मक कार्यक्रमातुन सांगण्यात येत आहे. तसेच संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ वाटप करून वाहनचालकांना ” तिळगुळ घ्या-सुरक्षित रहा ” हा संदेशही देण्यात आला. निगडी वाहतूक विभागामध्ये परिसरातील नागरिक, पोलीस मित्र, एसपीओ, पोलीस कर्मचारी यांनी सडक सुरक्षा शपथ घेतली.
निगडी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षिक विजया कारंडे म्हणाल्या, ” रस्ता अपघातांना आळा बसण्यासाठी व वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित पार पडण्यासाठी संपूर्ण देशात ३२ वा रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न होत आहे. या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सहयोगाने निगडी वाहतूक विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. आयुक्त व वाहतूक उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत पुढील दोन दिवस कार्यक्रम सुरू असणार आहेत.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांचे मार्गदर्शनानुसार महिला अध्यक्ष अर्चना घाळी, विभाग प्रमुख विशाल शेवाळे, सतीश देशमुख, बळीराम शेवते, लक्ष्मण इंगवले, बाबाबासाहेब घाळी, नितीन मांडवे, रामेश्वर गोहील, सुकेश येरूनकर, राजेश बाबर, अजय घाडी, निखिल कुमावत, नितीन ढमंगे, राजेंद्र कुंवर, सुरेश गावडे, संजय लोखंडे, संजय कांबळे, तेजस सकट, संजय महाजे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.


















