- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्त (क्रमांक १) प्रदीप जांभळे यांच्याकडे पाच महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपविली आहे. त्यामध्ये बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, स्थापत्य मुख्य कार्यालय, समाज विकास, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांचा समावेश आहे.
अतिरिक्त आयुक्त (क्रमांक १) विकास ढाकणे यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रदीप जांभळे हे २६ सप्टेंबर २०२२ ला रूजू झाले. त्यांच्याकडे उद्यान व संवर्धन, अग्निशामक, शिक्षण, स्थापत्य (उद्यान), माध्यमिक शिक्षण मुख्य कार्यालय, कायदा, कामगार कल्याण, अतिक्रमण, स्थानिक संस्थाकर बीआरटीएस प्रकल्प, विद्युत मुख्य कार्यालय, करसंकलन मुख्य कार्यालय, पाणीपुरवठा व जलनिस्सारण मुख्य कार्यालय, जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ आणि मध्यवर्ती भांडार हे १५ विभाग होते.
उपायुक्त स्मिता झगडे यांच्यासोबत वाद निर्माण झाल्याने स्थानिक संस्थाकर विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे महिन्याभरापूर्वी देण्यात आली होती. जांभळे यांच्याकडे वरील ५ महत्त्वाच्या विभागांची ही जबाबदारी आयुक्त सिंह यांनी मंगळवारी (दि. १०) सोपविली आहे. त्यामुळे ते पालिकेतील अधिक ‘पॉवरफुल’ अतिरिक्त आयुक्त झाले आहेत.
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, स्थापत्य मुख्य कार्यालय हे विभाग पूर्वी अतिरिक्तआयुक्त (क्रमांक २) जितेंद्र वाघ यांच्याकडे होते. त्या विभागांच्या बदल्यात जांभळे यांच्याकडील कायदा व बीआरटीएस प्रकल्प हे दोन विभाग अतिरिक्त आयुक्त वाघ यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे सामान्य प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय (बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय), क्रीडा, स्थापत्य प्रकल्प, वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना, निवडणूक व जनगणना, भूमीआणि जिंदगी आणि पर्यावरण अभियांत्रिकी हे विभाग आहेत.
अतिरिक्त आयुक्त (क्रमांक ३) उल्हास जगताप यांच्याकडील समाज विकास, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन हे तीन विभाग अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्याकडे देण्यात आले आहेत. तर, जगताप यांना कामगार कल्याण विभाग नव्याने देण्यात आला आहे. त्यांच्याकडे पूर्वीचे सुरक्षा, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, झोनिपु, आयटीआय, नागरी सुविधा केंद्र, अभिलेख कक्ष, बीएसयुपी, ईडब्ल्यूएस प्रकल्प, झोनिपु स्थापत्य, स्थानिक संस्था कर हे विभाग आहेत


















