- आठवडाभरात चाळीस लाखांचा दंड वसूल; नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरीकांची संख्याही मोठी असून त्यांच्याकडून दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. नागरीक वाहनासंबंधी वाहतुकीचे नियमांचे (फॅन्सी नंबर प्लेट, काळी काच, वगैरे) दिवसेंदिवस उल्लंघन करत असल्याचे दिसुन येत आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे तसेच पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी चिंचवड वाहतुक विभागामार्फत (दि. ९) ते (दि. १५) दरम्यान काळी काच (टेंन्टेड ग्लास), फॅन्सी नंबर प्लेट व आरटीओ च्या नियमानुसार नसलेल्या नंबर प्लेट या हेडखाली विशेष मोहिम राबविण्यात आली होती.
या मोहिमेदरम्यान काळी काच (टेंन्टेड ग्लास) च्या एकुण २८३१ केसेस करुन २७,४३,७०० रुपये दंड, फॅन्सी नंबर प्लेट व आरटीओ च्या नियमानुसार नसलेल्या नंबर प्लेटच्या एकुण २०२२ केसेस करुन १२,८७,९०० रुपये दंड आकारण्यात आला, अशा एकुण ४८५३ केसेस करुन एकुण ४०,३१,६०० एवढा दंड आकारण्यात आला आहे. यापुढे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या हेडखाली वाहतुक विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याने नागरीकांनी वाहतुक नियमांचे पालन करून पिंपरी चिंचवड पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने केले आहे.
















