न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- महिलांसाठी मोफत प्रशिक्षण व रोजगार निर्मिती करण्यासाठी तसेच प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत पर्यावरणपूरक बांबूपासून वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना मोफत देण्यात आले. यावेळी महिलांनी बांबुपासून अनेक वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यात प्रामुख्याने की होल्डर, राखी, महिलांच्या कानातले, महिलांच्या गळ्यातील हार, पणती ठेवायचे स्टॅन्ड असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण महिलांनी या शिबिरामधून घेतले. महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्ञान प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, यशवंतराव लिमये, पालक महासंघाचे अध्यक्ष नितीन गावडे, मनसे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, प्राधिकरण महिला विचार मंच अध्यक्ष स्वाती दानवले, माजी नगरसेविका शैलजाताई मोरे व पालक महासंघाचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व महिला वर्ग उपस्थित होते.
प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी बांबूपासून वस्तू बनवण्याचा उद्योग पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्याचा व महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून आर्थिक सबलीकरण व्हावे, हा प्रशिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश होता. या प्रशिक्षणामध्ये निगडी प्राधिकरणातील पंचवीस महिलांनी सहभाग घेतला. भविष्यात या प्रशिक्षणाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, अशा प्रतिक्रिया देत ज्ञान प्रबोधिनी शाळेचे व प्राधिकरण विचार मंचचे महिलांनी आभार मानले