न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- भारतमातेच्या रक्षणासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञ होण्याची आवश्यकता असते. याचसाठी ‘भारतीय सेना दिन’ निमित्त सोशल हॅंड्स फाउंडेशन कडून २० वीरपत्नींचा साडी भेट देऊन सन्मान करण्यात आला.
सैनिक युवा फोर्स मार्फत रविवारी थेरगाव येथे भारतीय लष्कर दिन साजरा केला गेला. यामध्ये पिंपरी चिंचवड सह राज्यभरातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. यावेळी सोशल हॅंड्स फाउंडेशन सदर उपक्रम राबविला.
भारतीय लष्कराचा आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी १५ जानेवारी रोजी ‘भारतीय सेना दिन’ साजरा केला जातो. लष्कर दिनानिमित्त देशाच्या विविध भागात भारतीय लष्कराच्या शौर्याबद्दल आणि बलिदानाबद्दल आदर व्यक्त केला जातो. या दिवशी मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांनाही श्रद्धांजली वाहण्यात येते. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी समजावून घेऊन, शहिदांचे परिवारातील वीरमाता व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
याप्रसंगी निवृत्त मेजर रामदास मदणे (संस्थापक, सैनिक युवा फोर्स), सोशल हॅंड्स फाउंडेशनचे अध्यक्ष मदन दळे, निवृत्त सैनिक चांगदेव कडलग, सचिन अडागळे, नीलेश जाधव, अशोक येडगे, सौ. माधुरी मदन दळे, सौ. कडलग तसेच शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता आणि नातेवाईक उपस्थित होते. उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी निवृत्त सैनिक चांगदेव कडलग यांनी विशेष परिश्रम घेतले.