- उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांची महापालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे सौदागर परिसरात पदपथासह स्मार्ट रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीतील रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला भूसंपादनाचा अडथळा येताना दिसतो. मात्र, दुसरीकडे चालू विकासकामांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही.
पिंपळे सौदागर येथील योगा पार्क उद्यान ते ट्रॉयस सोसायटी व झुलेलाल सोसायटी दरम्यान महापालिकेने अर्धवट रस्त्याची उभारणी केली आहे. रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे रस्त्यावरील खडीवर वाहने घसरून किरकोळ अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
तसेच विबग्योर आणि नॅचरल आईसक्रीम समोर पालिकेने ड्रेनेज लाईनसाठी अनेक दिवसांपासून मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. जवळच विबग्योर शाळा असल्यामुळे शाळेत येणाऱ्या मुलांना आणि पालकांना तसेच जेष्ठ नागरिकांना, वाहनचालकांना याचा नाहक त्रास होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने तत्काळ रस्त्याचे आणि ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण करून नागिरकांना दिलासा द्यावा, अशी मागणी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.