- पक्षश्रेष्ठीकडून महाविकास आघाडीतील नेत्यांची मनधरणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२३) :- भाजपने पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूर पोटनिवडणूक ताकदीने लढविली होती. त्यामुळे कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासाठी अनुकूलता दर्शविली आहे.
मृत्यू पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत सहानुभूती म्हणून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राज्यात संस्कृती आहे. परंतु तीन विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये ती पाळली गेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद असलेल्या पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक लढण्यासाठी या पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही हा सूर उमटला. याबाबतचा निर्णय एकट्याने न घेता शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून घेतला जावा, यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. भाजपने मागील तिन्ही निवडणुका लढल्याची आठवण करून दिली असता उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीने दोन्ही पोटनिवडणुका लढवाव्यात याबाबत सकारात्मक असल्याचे समजते. आता काँग्रेस नेत्यांसोबतही अजित पवार चर्चा करणार आहेत.

















