न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी (दि १८) रोजी जाहीर केला होता. या जागेसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात येणार होती. परंतु आयोगाने अचानक मतदानाच्या तारखेत आज बुधवारी बदल केला आहे. आता २७ फेब्रुवारीला होणारी निवडणूक एक दिवस आधी म्हणजेच २६ फेब्रुवारीला होणार आहे.
दिवंगत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान ३१ जानेवारीला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारीला आहे. तर, ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल.
पुणे जिल्हा निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला होता. पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे या निवडणुकीची तारीख बदलावी, असे अहवलात नमूद केले होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक २६ फेब्रुवारीला होणार आहे.

















