न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- ईडीच्या छाप्यादरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानी याला पोलिसांनी अटक केली. सोमवारी (दि. ३०) मूलचंदानी याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालय (ईडी) च्या पथकाने अमर मूलचंदानी याच्या घरावर शुक्रवारी (दि. २७) छापा मारला. या वेळी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अमर मूलचंदानी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अमर मूलचंदानी याला अटक करून सोमवारी (दि. ३०) न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातील अन्य पाच जणांना रविवारी (दि. २९) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे अवताडे यांनी सांगितले.