- राष्ट्रवादीचे भाजपला खुले आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२३) :- भाजपने कमळ चिन्ह बाजूला ठेवून उमेदवार द्यावा, आम्ही निवडणूक बिनविरोध करू. भाजपच्या उमेदवाराला कोणतीही सहानुभूती मिळणार नाही. कारण भाजपची बूथ कमिटीची तयारी दोन महिन्यांपासून सुरू होती, असे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपळे गुरव येथील चंद्रभागा सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीचे नियोजन माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले होते. यावेळी भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, कविता आल्हाट, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, नाना काटे, अतुल शितोळे, अरुण पवार, राजू लोखंडे, श्याम जगताप, विशाल वाकडकर, प्रशांत सपकाळ, तानाजी जवळकर, शिवाजी पाडुळे, वर्षा जगताप, विनोद नढे, नितीन सोनवणे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील शेळके म्हणाले, की पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. अंतर्गत गटतट यामुळे राष्ट्रवादी ची सत्ता गेली. मावळाची जनता माझ्या पाठीमागे उभी राहते, मग पिंपरी चिंचवड मधील जनता का पाठीमागे राहत नाही. विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडतो. भाजपचा भ्रष्टाचारावर आवाज उठवला पाहिजे. संघटनात्मक काम केले पाहिजे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बुथप्रमुख महत्त्वाचा घटक आहे. सोबत शिवसेना, काँग्रेस, वंचित असेल. पण मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपला अजेंडा पोहोचवला पाहिजे. मतभेद, गैरसमज बाजूला ठेवा. पक्षासोबत गद्दारी करू नका. लोकसभेचे खासदार म्हणून बारणे यांनी मतदारसंघात काय ठोस काम केले. लोकसभेची वाट बघतोय, बारानेचे बारा नाही वाजवले तर नाव विचारू नका.
प्रशांत शितोळे म्हणाले, भावनात्मक होऊन चालणार नाही, भावनेला तडा देऊन पुढे जायचे आहे. केवळ भावनेवर राजकारण चालत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आपापल्या परिसरात पक्षाला लीड कसे मिळवून देता येईल, याचे नियोजन करावे लागेल. महापालिकेत सत्ता हवी असेल तर ही निवडणूक महत्त्वाची आहे.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, वारसाहक्क हा संपत्तीत असतो, राजकारणात नसतो. विरोधकांकडून नकारात्मक प्रचार होऊ शकतो. शहराचे यांनी वाटोळे केले. यांची जागा दाखवायची वेळ आलीय. काहीही करा निवडून द्या, ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. ही निवडणूक धर्म अधर्माची आहे. दादांना ही विधानसभा गिफ्ट द्या, आणि दाखवून द्या की आम्ही सोबत आहोत.
अजित गव्हाणे म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप गेल्याचे दुःख आहे, पण भाजप धर्म पाळत नाही. कधीही निवडणूक घेऊ द्या. महापालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आहे. अजितदादांच्या सूचनेनुसार काम चाललेले आहे. सर्वांनी त्या त्या प्रभागात काम करायचे आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालायचे आहे.
राजेंद्र जगताप म्हणाले, राजकारणात सहानुभूती नसते. सर्वांनी एक होऊन काम केले पाहिजे. बुथप्रमाणे काम करण्याची गरज आहे. मतदान करून घेतले पाहिजे. आपापल्या प्रभागात नियोजनबद्ध तयारी सुरू करावी. ग्राउंड लेव्हलला काम करावे. तिकीट कुणालाही मिळू द्या, सर्वांनी मिळून काम केले पाहिजे.
नाना काटे म्हणाले, शहरातील मुख्य मुद्दे काढून त्यानुसार निवडणूक लढवावी. भाजपचे लोक एका बाजूला विरोधकांना बिनविरोध करण्याचे आवाहन करतात आणि दुसऱ्या बाजूला बैठकावर बैठका सुरू आहेत. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहा.
श्याम जगताप : कोणतीही सहानुभूती न दाखवता पक्षीय पातळीवर व्यहरचना झाली पाहिजे. सर्वांनी एक होऊन. शैलेश दिवेकर म्हणाले, बूथनुसार काम करायचे आहे. जो विकास दिसतोय तो राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मतदान लिस्टवर काम करा. प्रास्ताविक विनायक रणसुंभे यांनी केले.