- सहा उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक लढण्याबाबत आम आदमी पार्टीकडे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आग्रही मागणी केलेली आहे. त्यानुसार चिंचवडसाठी ६ व कसब्यासाठी ४ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. हे अर्ज दिल्लीत पक्षाकडे पाठविले आहेत. निवडणूक लढविण्याबाबत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून दिल्लीतून निर्णय होईल. या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत. उमेदवारीबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होईल, अशी माहिती आपचे प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी-चिंचवडचे प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी गुरुवारी (दि. २) आकुर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली.
चिंचवड पोटनिवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते व केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. त्यानुसार राज्याचे प्रभारी दिपक सिंगला, सह प्रभारी गोपाल इटालिया हे पक्षाच्या पोलिटिकल अफेअर कमिटीच्या माध्यमातून उमेदवारीची घोषणा करतील, असे राठोड यांनी सांगितले. यावेळी आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे उपस्थित होते.
राठोड म्हणाले, ‘‘राजकारणात भावनिक होऊन चालत नाही. सहानुभूतीचा फायदा त्यांना घ्यायचाय, पण सध्या दिवस बदलले आहेत. आमची बांधिलकी जनतेशी आहे. आम्ही राजकारण बदलायला आलोय. पिंपरी-चिंचवड हे महानगर असून राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून या शहरात लोक आले आहेत. आयटी मधील वर्ग दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मानणारा आहे. या शहरात दीड लाखांपेक्षा जादा आयटी मतदार आहेत. त्यांच्या व भाडेकऱ्यांच्या समस्या घेऊन आम्ही निवडणुकीला सामोर जाऊ. आप मोबाईलच्या माध्यमातून घराघरांत पोचली आहे. चांगले आरोग्य, शिक्षण व मोफत वीज हे ‘आप’ने दिल्याचे नागरिकांना माहिती आहे. परंतु; कार्यकर्त्यांनी घराघरात पोचणे गरजेचे आहे.
















