- महाविकास आघाडीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार नावाची घोषणा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे सर्वेसर्वा तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरूवारी (दि. २) घेतल्या. त्यानंतर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या २ ते ३ दिवसांत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील बारामती होस्टेल येथे या मुलाखती झाल्या. ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, माजी नगरसेविका माया बारणे तसेच, अॅड. गोरक्ष लोखंडे, माधव पाटील या इच्छुकांची मुलाखत अजित पवार यांनी घेतली. त्यांच्याशी त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकांतात आणि पुन्हा सर्वांशी एकत्र चर्चा केली.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, चिंचवडचे निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगला कदम, जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते.
अजित पवार यांनी इच्छुक व पदाधिकाऱ्यांशी सविस्तरपणे चर्चा केली. चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांशी माझी चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत ती जागा राष्ट्रवादीला सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाचा प्रचार सुरु करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. इच्छुकांच्या मुलाखतीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व इतर नेतेमंडळीशी चर्चा करून उमेदवाराचे नाव येत्या २ ते ३ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















