पिंपरी चिंचवड पोलीसांची धाडसी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच महिन्यात ११० गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
सर्व पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया व अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सक्त सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचे रेकॉर्ड अद्यावत करून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्याकडून व गुन्हे शाखेकडून आढावा घेवून मोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे ७ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यावर पोलीस उप-आयुक्त यांच्या अभिप्रायानंतर अपर पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे यांनी टोळ्यांवर दाखल असलेल्या ७ गुन्ह्यांमध्ये मोका कायद्याच्या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केले. एकुण ११० गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. एका गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करून कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
दरम्यान चिंचवड पोलीस ठाण्यातील अनिल तुकाराम मोहिते, व इतर १०, हिंजवडी पोलीस ठाण्यातील हिरा बहादुर हमाल व इतर ७, चाकण पोलीस ठाण्यातील शुभम सुरेश म्हस्के व इतर १७, निगडी पोलीस ठाण्यातील दत्ता बाबु सुर्यवंशी व इतर ०३, चिंचवड पोलीस ठाण्यातील आकाश राजू काळे व इतर ०६, पिंपरी पोलीस ठाण्यातील विशाल विष्णू लष्करे व इतर ३०, तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यातील कुणाल धिरज ठाकुर व इतर २९ या टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच निगडी पोलीस ठाण्यातील अक्षय मुकुंद गायकवाड याला एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे गुन्हे शाखेच्या पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली आहे.
















