न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२३) :- माथाडीच्या नावाखाली उद्योजकांना कोणी धमकावत असल्यास आता थेट तक्रार करता येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. यावर उद्योजकांना थेट तक्रार करता येणार आहे.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहर परिसरात हजारोंच्या संख्येत छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांतील वेगवेगळी कंत्राट मिळवण्यासाठी साम दाम दंडाचा वापर केला जातो. ज्यामुळे उद्योगांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील उद्योगांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नुकतेच चाकण येथे कंपनी प्रतिनिधींसोबत पोलिसांनी बैठक घेतली. ज्यामुळे कंपन्यांमध्ये अनधिकृत माथाडीविरोधात आत्मविश्वास आला आहे. त्यानंतर महाळुंगे चौकी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. यामुळे पोलीस आता माथाडीच्या नावाखाली कंपन्यांना त्रास देणाऱ्यांची गय करणार नाहीत, असा संदेश पोहचवण्यात पोलिस यशस्वी ठरले. याच्याही पुढे जाऊन पिंपरी- चिंचवड पोलिसांनी आता अनधिकृत माथाडी आणि कंपन्यांमधील गुन्हेगारीबाबत तक्रार देण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला. ज्यामुळे आता कंपन्यांना थेट पोलिसांशी संपर्क साधता येणार आहे.
उद्योगाशी निगडित कोणत्याही गुन्हेगारी घटनांबाबत ९५२९६९१९६६ या क्रमांकावर तक्रार करता येईल. तक्रार केल्यानंतर नजीकच्या पोलिस ठाण्यातून संबंधितांना प्रतिसाद देण्यात येणार आहे. तक्रारदार आपले नाव गुप्त ठेवू शकतात.
















