- अखेरच्या दोन दिवसात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे पोलिसांना निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणतीही कमतरता राहणार नाही यादृष्टीने पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी, नामनिर्देशन भरण्यासाठी राहिलेल्या शेवटच्या दोन दिवसामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने आज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन आणि सेक्टर ऑफिसर यांची संयुक्त बैठक पार पडली, त्यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय,थेरगांव येथे झालेल्या या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, निवडणूक सहाय्यक नागेश गायकवाड, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह सेक्टर ऑफिसर तसेच वाकड, सांगवी, देहूरोड, चिंचवड, हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, शिवाजी गवारे, स.बा.माने, सुनील टोनपे, वाहतूक विभागाचे सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र होणराव, आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अस्तित्वात राहणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस आणि निवडणूक कामाकाजासाठी नेमलेल्या प्रशासकीय यंत्रणेसमवेत समन्वय राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रामधील सुविधा, मतदान केंद्राचे साहित्य वाटप, मतदार संघातील संवेदनशील आणि असुरक्षित मतदान केंद्रांची निश्चिती तसेच तेथील सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन, मागील निवडणूकीच्या कालावधीतील नोंदविलेल्या गुन्ह्यांची माहिती घेणे, संवेदनशील मतदार संघांचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करणे, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सचिन ढोले यांनी बैठकीत संबंधिताना विविध सूचना केल्या. मतदान केंद्र, मतदार संख्या यादृष्टीने इतर मतदार संघाच्या तुलनेत चिंचवड मतदार संघ सर्वात मोठा आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. यासाठी सर्व बाबींचा विचार करून नियोजन केले जात आहे. पोलीस प्रशासनाने निवडणूक कामकाजासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करावा, आदी सूचनाही ढोले यांनी यावेळी केल्या. पोलीस प्रशासन व निवडणूक विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार निवडणूक कामकाज यशस्वीरित्या पार पाडावे असेही ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रिया शांततेने आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी यावेळी सांगितले. निवडणूक कामकाजासाठी पोलीस प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे डिसले म्हणाले.
















