- भाजपकडून लक्ष्मणभाऊंच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर..
- महाविकासकडून शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून आज शनिवारी उमेवार जाहीर करण्यात आले आहेत.
भाजपाने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्या नावांचा विचार केला जात आहे. त्यात राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर आहे. आज चार वाजेपर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता आहे.
दरम्यान भाजपने अश्विनी जगताप यांच्या रूपाने महिला उमेदवार मैदानात उतरविल्यामुळे महाविकास आघाडी ऐनवेळी माघार घेणार घेऊन निवडणूक बिनविरोध करणार? की, अपक्ष महिला उमेदवाराला मदतीचा हात पुढे करणार? याबाबत राजकीय तर्क-वितर्कांना उधान आले आहे.


















