न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२३) :- शाहूनगर, प्राधिकरणातील तीनही उद्यान, संत ज्ञानेश्वर उद्यानातील ओपन जिम म्हणजेच “अ “प्रभागातील १३ खुल्या व्यायामशाळेतील उपकरणे नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून परिसरातील नागरिक व्यायामापासून वंचित होते. सहज आणि चालता बोलता व्यायाम करण्यासाठी नागरिकांची खुल्या व्यायामशाळेस पसंती आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी क्रीडा विभागास या संदर्भात तक्रार दाखल केली होती. तसेच २० डिसेंबर २०२२ पासून सतत पालिकेच्या क्रीडा विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकारी केदारी तसेच खांडेकर व भारंबे यांच्याशी संपर्कात होते. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी १३ खुल्या व्यायामशाळेकरिता दुरुस्ती निविदा काढली गेली आणि २ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” खुल्या व्यायामशाळा संपूर्ण शहरात ६० पेक्षा जास्त सुरू केल्या गेल्या. परंतु योग्य रखरखाव न ठेवल्यामुळे बहुतांशी व्यायामशाळा ह्या बंद अवस्थेत आहेत. ब प्रभाग तसेच अन्य प्रभागातील उपकरणे ही मोडकळीस आलेले आहेत. त्यांचीही दुरुस्ती केली जावी. म्हणजे नागरिकांना व्यायामाचा आनंद घेता येईल. या संदर्भात प्रसिद्धिमाध्यमातुनही बातमी दिली गेली होती. त्याला अखेर यश आले असून या आठवड्यात सर्व १३ खुल्या व्यायामशाळा पूर्वरत सुरू होतील “.












