- एफ. सी. वायर्न कप जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १४ वर्षाखालील मुलांसाठी एफ. सी. वायर्न कप जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब वायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झालेला आहे. राज्यात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल व फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडानैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांना चालना मिळणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व वायर्न म्युनिक, जर्मनी यांच्या करारानुसार क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. वायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा, विभाग व राज्य अशा क्रमाने स्पर्धा आयोजन होणार असून राज्य स्पर्धेतून एकूण २० खेळाडूंची निवड करून त्यांना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने एफ. सी. वायर्न कप पुणे जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धा (१४ वर्षाखालील मुले फक्त) डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे दि. १५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु करणात येणार आहे.
ही क्रीडा स्पर्धा १४ वर्षाखालील मुले वयोगटात होणार असून स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता खेळाडूचा जन्मदिनांक ०१.०१.२००९ नंतरचा असणे आवश्यक आहे. संघसंख्या अधिकत्तम २० खेळाडूंची असावी. जिल्हास्तरावर स्पर्धेचे आयोजन क्षेत्रनिहाय भाग्यपत्रिका काढून ४ विभागातील विजयी संघामधून स्पर्धा घेउन अंतिम संघ व खेळाडूंची निवड केली जाणार आहे. प्रवेश अर्जासोबत खेळाडूंचे आधार कार्ड, जन्मदाखला बोनाफाईड प्रमाणपत्र जमा करावे. प्रत्येक संघाने फुटबॉल खेळासाठी आवश्यक क्रीडा साहित्य, गणवेश व आवश्यक बाबी स्वतःसोबत आणाव्यात. एफ. सी. वायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे राज्यस्तरावरिल आयोजन मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असून तत्पुर्वी जिल्हा व विभागस्तरावरिल आयोजन होणार आहे. शालेय क्रीडा स्पर्धेसाठी सोबत उपलब्ध करुन दिलेला प्रवेश अर्ज दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी दु. ३.०० वा. पर्यंत क्रीडा विभाग कार्यालय, साई कृपा कमर्शियल कॉम्प्लेक्स, खराळवाडी, पिंपरी येथे महाकाळ ए. के. क्रीडा पर्यवेक्षक (मो.नं. 8767884158) किंवा SNBP स्कुल, मोरवाडी, पिंपरी येथे फिरोज शेख, SNBP स्कुल, क्रीडा व्यवस्थापक (मो.नं. 9890786629) यांच्याशी समन्वय साधूल ऑफलाईन पद्धतीने जमा करावेत, असे आवाहन महापालिकेचे क्रीडा सहा. आयुक्त यांनी केली आहे.












