- एक एप्रिलपासून दर लागू; स्वच्छ भारत अभियानाचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२३) :- कचरा संकलन सेवाशुल्कासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक घरातून दरमहा ६० रुपये द्यावे लागणार आहेत. त्याची अंमलबजावणी प्रशासकीय राजवटीत १ एप्रिल २०२३ पासून केली जाणार आहे. मिळकतकर बिलात वर्षभराची रक्कम समाविष्ट करून या शुल्काची वसुली केली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या ८ एप्रिल २०१६ च्या अधिसूनचेनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ लागू करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा दररोज जमा केला जातो. कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिकेने जनजागृतीसाठी संस्थांही नेमल्या आहेत. कचरा संकलनासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधीचा खर्च करते.
राज्य शासनाच्या १ जुलै २०१९ च्या स्वच्छता व आरोग्य उपविधी अनुसूचीनुसार सर्व महापालिकांसाठी उपयोगकर्ता शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यानुसार, पालिकेच्या २० ऑक्टोबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत नागरिकांकडून सेवाशुल्क वसुलीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजवाणी प्रशासकीय राजवटीत १ एप्रिल २०२३ पासून होईल. त्या शुल्काची आकारणी मिळकतकर बिलात समाविष्ट करून त्यांची वसुली केली जाणार आहे. दरम्यान, मिळकतकरात वृक्ष उपकर, मलप्रवाह सुविधा लाभकर, पाणीपुरवठा लाभकर, रस्ता कर, शिक्षण कर वसूल केला जातो. आता नव्याने कचऱ्यासाठी सेवा शुल्क कर लावला जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात कचरा संकलनाच्या सेवेसाठी शुल्क वसूल करण्याची अट आहे. त्यासाठी तब्बल ३५० गुण आहेत. त्यासाठी महापालिका हे शुल्क लागू करत आहे. तसेच, ओल्या कचऱ्याची कंपोस्टिंगद्वारे खतनिर्मिती करणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांना हे शुल्क आकारले जाणार नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेने नियुक्त केलेल्या घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा. रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच १ एप्रिलपासून कचरा संकलनासाठी सेवाशुल्क आकारले जाणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
असे आहे दरमहा सेवाशुल्क :-
- घर – ६० रुपये
- दुकान, दवाखाने – ९० रुपये
- फर्निचर, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स शोरूम – १६० रुपये
- गोदाम – १६० रुपये
- हॉटेल – १६० रुपये
- राहण्याची व जेवणाची व्यवस्था असलेले हॉटेल – २०० रुपये
- ५० बेडचे रुग्णालय – १६० रुपये
- ५० पेक्षा अधिक बेडचे रुग्णालय – २४० रुपये
- शैक्षणिक संस्था, वसतिगृह – १२० रुपये
- धार्मिक संस्था – १२० रुपये
- मंगल कार्यालय, चित्रपटगृह – २००० रुपये
- खरेदी केंद्र, मल्टिप्लेक्स थिएटर – २००० रुपये
- फेरीवाले – १८० रुपये
- हंगामी दुकान, आनंद मेळा, सत्संग, खाद्य महोत्सव, फटाक्याचे दुकान – एक वेळचे शुल्क












