- महापालिकेची मोठी कारवाई; चिखलीतील सर्वाधिक मिळकतींचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- वारंवार नोटीस बजावून देखील मिळकत कर न भरलेल्या निवासी व बिगरनिवासी अशा एकूण ५५१ मालमत्ता महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून सील करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सील केलेल्या १७४ मालमत्ता या चिखली विभागीय कार्यालयांतर्गत येतात. एप्रिल २०२३ मध्ये या मालमत्तांचा लिलाव काढण्यात येणार आहे.
मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांना वारंवार नोटीस बजावण्याचे आदेश सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी सर्व विभागीय कर संकलन कार्यालयांना दिले होते. तीन वेळा नोटीस बजावूनही जो थकीत कर न भरलेल्या मिळकतधारकांच्या विरोधात अखेर जप्तीच्या नोटीसा काढण्यात आल्या. त्यानंतरही प्रतिसाद न दिल्यामुळे विभागप्रमुखांच्या आदेशाखाली मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. तरीही कर भरण्यास चालढकल करणाऱ्या नागरिकांच्या मिळकती थेट सील करण्यात आल्या. अशा एकूण ५५१ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. सुमारे १०० निवासी मालमत्तांचा त्यामध्ये समावेश असून ४५१ बिगरनिवासी मालमत्ता आहेत. जप्ती केलेल्या ५५१ मालमत्तांचा थकीत कर १५ कोटींच्या घरात आहे.
चिखली विभागीय कर संकलन कार्यालयांतर्गत येणा-या भागातील १७४ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ मनपा भवन परिसरातून ६६ मिळकती सील केल्या. फुगेवाडी दापोडी येथील ५५, वाकडमधील ५०, आकुर्डीतील ३५, भोसरीतील ३५, सांगवीतील २७, मोशी येथील १९, किवळे भागातील १९ निगडी प्राधिकरण मधील १४, थेरगाव परिसरातील १५, पिंपरी वाघेरे येथील १०, तळवडे मधील ८. दिघी बोपखेल मधील १, पिंपरीतील ७, चिंचवडमधील ९, चऱ्होलीतील ७ अशा एकूण ५५१ मिळकती सील केल्या आहेत. यात सर्वाधिक १७४ मालमत्ता चिखली भागातील असून त्याखालोखाल ६६ मालमत्ता या मनपा भवन परिसरातील आहेत.
” धक्कीबाकीदार मिळकतधारकांना वारंवार नोटीस बजावू देखील कर न भरलेल्या ५५१ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. यातील सुमारे १०० मालमत्ता निवासी असून इतर मालमत्ता बिगरनिवासी आहेत. सील केलेल्या मालमत्तांचा एप्रिल २०२३ मध्ये लिलाव करण्यात येणार आहे ”.
– निलेश देशमुख, सहायक आयुक्त…


















