- निवडणुका घेणं बंद करून एकछत्री कार्यक्रम लागू करा..
- उद्धव ठाकरेंकडून निवडणूक आयोग लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- निवडणूक आयोगंच आचारसंहितेचा भंग करतेय. राज्यात दोन ठिकाणी पोट निवडणूक सुरु आहेत. आयोगाच्या या निर्णयाचा मतदारांवर परिणाम होणार आहे, हे आयोगाला कळत नाही का? त्यांनी आजच हा निर्णय का घेतला?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने आज निकाली काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी निवडणूक आयोगावर अनेक पद्धतीने आसूड ओढला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा निर्णय अनपेक्षित आहे. निवडणूक आयुक्तांनी इतके दिवस थोतांड केलं. पक्ष संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयोगानं आज शेण खाल्लं. उघड उघड लोकशाहीची हत्या केली. आमदार, खासदार यांच्या संख्येवरच निर्णय द्यायचा होता तर, आमच्याकडून सदस्यसंख्या प्रतिज्ञापत्र का घेतली. आम्ही लाखांच्या संख्येने पत्रं दिली; आम्ही रद्दी दिली नाही. त्याचं वजन त्यांना पेलवल नाही, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला.
देशात बेबंदशाही सुरु आहे अशी घोषणा पंतप्रधानांनी करावी. पालिका निवडणुका लावण्यासाठीच आजचा हा निर्णय आहे. उद्या केंद्राचे गुलाम आमच्याकडून मशाल काढून घेऊन महापालिका निवडणुका लावतील. निवडणुका घेणं बंद करून एकछत्री कार्यक्रम लागू करावा. शिवसेना भवनावर दावा करायला, मोगलाई आहे? आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. आम्ही कोर्टात जाणार. खरा धनुष्यबाण आमच्याकडेच आहे, असेही ठाकरे म्हणाले.


















