न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२३) :- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती पोवाडे, नाटिका, नृत्य, प्रश्नमंजुषा आदी उपक्रमांनी ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या व वार्षिक क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बालचमूंनी सुंदर पाळणा सादर केला. यावेळी त्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. अफजल खान वध हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षिका दीपा गायकवाड, ज्योती फर्तीयाल, अमृता अमोलिक, बिस्मिल्ला मुल्लाआदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिवजयंती विषयी माहिती सांगितली. विद्यार्थिनी आकांक्षा राऊतने शिवजयंतीविषयी भाषण केले. विद्यार्थ्यांनी अफजलखानचा वध ही नाटिका सादर केली. तसेच माय भवानी या गाण्यावर नृत्य सादर केले. संकर्षण वरेकर या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. ऐतिहासिक प्रश्नांवर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शिवबा आमचा मल्हारी हे गाणे सादर केले. तर राजमुद्रा म्हणजे काय? याबाबत सयाजी जगताप या विद्यार्थ्याने माहिती दिली.
आरती राव म्हणाल्या, की आपणही शिवाजी महाराजांसारखी निष्ठा ठेवूनच आपले कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे. प्रणव राव म्हणाले, की कारणे देणे हा प्रकार शिवचरित्रामध्ये कुठेच नाही, त्यामुळे कारणे देत राहिलो, तर आपल्याला यश कधीच मिळणार नाही. परिस्थितीवर रडायचे नाही, तर लढायचे.
मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, आशा घोरपडे, नीलम पवार, प्राचार्या शीतल मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या विविध गुणांविषयी माहिती सांगून ते गुण आपण आत्मसात केले पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यांची रचना व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
सूत्रसंचालन शिक्षिका प्रीती पितळे, विद्यार्थिनी सायली जोगी, अनुष्का जाधव यांनी केले. तर शिक्षिका शारदा पोफळे, अमृता अमोलिक यांनी आभार मानले.


















