- महत्वाच्या पदासाठी पुन्हा रस्सीखेच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) रद्द केली आहे. त्यानंतर सोमवारी जांभळे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे मॅटने निकाल दिल्यानंतरदेखील महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदाचा तिढा कायम आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली होती. मात्र, राज्य शासनाने आपल्याच आदेशावर घूमजाव करत त्यांची पदोन्नती रद्द केली. याबाबत स्मिता झगडे यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती. त्यावर पाच महिन्यांनी मॅटने निकाल दिला. त्यामध्ये प्रदीप जांभळे यांची नियुक्ती रद्द करून स्मिता झगडे यांना रुजू करून घेण्याबाबत मॅटने आदेश दिले. मात्र, निकालाविरोधात जांभळे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.
त्यामुळे मॅटने दिलेल्या आदेशावर स्थगिती आल्यास प्रदीप जांभळे हे निकाल लागेपर्यंत पदावर राहण्याची शक्यता आहे. मॅटच्या निकालानंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदाचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप हा तिढा कायम आहे. हा तिढा कधी सुटणार, न्यायालय काय निर्णय देणार, याकडे प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची १३ सप्टेंबरला बदली झाली. त्यांच्या जागेवर महापालिकेमध्ये उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. ढाकणे यांची बदली झाल्यानंतर तब्बल दहा दिवस स्मिता झगडे यांना महापालिकेत रुजू करून घेतले नाही.
त्यानंतर २२ सप्टेंबरला राज्य शासनाने आपल्या आदेशावर घूमजाव करत स्मिता झगडे यांची पदोन्नती रद्द केली, तर प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. प्रदीप जांभळे यांनी २३ सप्टेंबरला तातडीने येत आपला पदभार स्वीकारला. याबाबत, स्मिता झगडे यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती. त्यामध्ये राज्य शासन, पिपरी- चिंचवड महापालिका आणि प्रदीप जांभळे यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
- मॅटचा निकाल आला आहे. त्यासाठी आता, उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केले आहे. – प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त…













