- निगडीतील विचार प्रबोधन पर्वात नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- “आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो की, आम्ही या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू. या वसुंधरेला, या पर्यावरणाला आमच्या पासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटीबद्ध राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि सुजलाम- सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करू, ह्या आपल्या वसुंधरेची काळजी घेण्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करू” अशी हरित शपथ शहरातील हजारो नागरिकांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत घेतली.
छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाच्या निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथील कार्यक्रमात महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ अंतर्गत स्वच्छता जनजागृती दरम्यान पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी “आपले शहर स्वच्छ आणि सुंदर शहर” अशा घोषणा देऊन स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मार्गदर्शन करताना आपल्या उज्वल भविष्यासाठी आणि सुंदर आयुष्यासाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाची गरज आहे असे सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महानगरपालिका त्यांच्या जीवनावर आधारित विविध प्रबोधन पर्वाचे दरवर्षी आयोजन करीत असते. यावर्षी देखील शहरातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे भक्ती-शक्ती चौक निगडी,संभाजीनगर चिंचवड, डांगे चौक थेरगाव आणि एच.ए. कॉलनी,पिंपरी या चार ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रबोधन पर्वात विविध कार्यक्रमांचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेट्ये, प्रशांत देशमुख, रविंद्र खरे, गणेश शिंदे, बाजीराव महाराज बांगर, तात्यासाहेब मोरे, डॉ. प्रमोद बो-हाडे, तृप्ती धनवटे-रामाने, दस्तगीर अजीज काझी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध विषयांवरील व्याख्याने पार पडली.
महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर देवानंद माळी, अवधूत विभूते, सुरेश सूर्यवंशी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत पोवाड्यांचा कार्यक्रम सादर झाला. सुधाकर वारभुवन यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण झाले. तसेच मित्राय प्रोडक्शन,कोल्हापूर यांचे राष्ट्रपती महोदय यांच्या समोर दिल्ली येथे सादर झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित २५० कलाकार, घोडे, उंट यांचा समावेश असलेले ५ मजली सेटवरील “शिवगर्जना” हे भव्य महानाट्य सलग तीन दिवस निगडी येथे सादर झाले. हे महानाट्य पाहण्यासाठी शहरातील हजारो नागरिकांची मोठी गर्दी कार्यक्रम स्थळी झाली. यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके यांच्या सह शिवजयंती भक्ती-शक्ती उत्सव समितीचे सदस्य, विविध विभागातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. हरित शपथेचे वाचन आणि सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.













