न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चॉईस पोस्टिंगच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या लिपिकाची बदली करून, खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. संबंधित लिपिक बदल्यांसाठी पैसे घेत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तांनी कारवाई केलेल्या लिपिकाचे नाव भुट्टे असे आहे. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार पोलीस ठाणे देण्यात आले.
मात्र, या बदल्या होत असताना आयुक्तलयातील एका लिपिकाने बदल्यांसाठी पोलिसांकडून पैसे घेतल्याची कुजबूज आयुक्त पद्मनाभन यांच्या कानावर आली. याबाबत खातरजमा केल्यानंतर संबंधितावर कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.











