पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- आम्ही जातो आमुच्या गावा | आमचा राम राम घ्यावा || या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे स्मरण आज वारकरी इंद्रायणी काठच्या देहू नगरीत करत होते. जगतगुरू संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्याचे ३७५ वे वर्ष असल्याने यंदाच्या वर्षी इंद्रायणी काठ तुडुंब गर्दीने फुलून गेला होता.
दोन दिवसापासूनच राज्यातून व परराज्यातून लाखो वारकरी देहू नगरीत बीज सोहळ्यासाठी पोहचत होते. त्यांना ह्या सोहळ्यात अडचणींचा सामना करता येऊ नये म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या ३० स्वयंसेवकांचा एक गट दोन दिवसांपासून मुख्य मंदिर व वैकुंठ गमन विठ्ठल मंदिर, नांदूरकी वृक्ष मंदिर परिसरात वारकऱ्यांना स्वच्छ पाणी देणे तसेच वैदयकीय मदत मार्गदर्शन करणे त्याचप्रमाणे पोलीस विभागास बंदोबस्त करीता सहकार्य करीत होता.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका वर्षाराणी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे ,प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्ष अर्चना घाळी, विभावरी इंगळे,बळीराम शेवते, लक्ष्मण इंगवले, राजेंद्र कुंवर, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, सतीश देशमुख यांनी गटप्रमुख म्हणून काम पाहिले.
महिला अध्यक्षा अर्चना घाळी म्हणाल्या, “यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले तरीही वैष्णवांची मोठी गर्दी बीज सोहळ्यास होती, बळीराजा पिंकांचे नुकसान होऊ नये ह्यासाठी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन साकडे घालताना दिसून येत होता.त्यांच्या ह्या भोळ्या भक्तीपूढे आमची वैष्णव सेवा तोकडीच ठरत आहे.”
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील म्हणाल्या,” यदांच्या वर्षी भाविकांची लक्षणीय गर्दी पाहता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या सदस्यांची मोलाची मदत व सहकार्य पोलीस प्रशासनाला मिळत आहे. आषाढी वारी असो वा बीज सोहळा पोलिस मित्र व समिती योग्य प्रकारे पोलीस विभागास मदत करित असते.यंदाच्या वर्षी वैष्णवांची संख्या वाढली असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.”
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” नांदूरकी वृक्षाची १२ वाजून दोन मिनिटांची विशेष सांकेतिक हालचाल डोळ्यांनी टिपण्यासाठी लाखो वैष्णव देहूत बीजोत्सवास इंद्रायनीतिरी दर वर्षी उपस्थित होतात.अश्या वेळी गर्दीत वारकऱ्यांना अडचनिंचा सामना करावा लागू नये. म्हणून समितीचे स्वयंसेवक, एस पी ओ दरवर्षी सेवा देण्याचे कार्य करीत असतात. यंदाच्या वर्षी समितीचे ३० स्वयंसेवक देहूत सेवा देत आहेत.”












