न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- अट्टल गुन्हेगार बाळा वाघेरे याला पोलिसांनी राहत्या घरातून उचलले आहे. पैशाच्या व्यवहारातून वाघेरे याने एकाचे अपहरण केल्याची तक्रार आल्यानंतर बुधवारी (दि. १५) चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी २९ वर्षीय व्यावसायिकाने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळा वाघेरे (रा. पिंपरीगाव), राहुल उनेचा, हरीश चौधरी (दोघे रा. वाल्हेकरवाडी) यांच्यासह अन्य एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि आरोपी चौधरी यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. फिर्यादी यांनी व्यवहारातील सर्व रक्कम चौधरी याला माघारी दिली आहे. मात्र, तरी देखील चौधरी फिर्यादी यांच्याकडे पैशाची मागणी करीत होते. दरम्यान, बुधवारी सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे अपहरण केले. त्यांना आरोपी बाळा वाघेरे यांच्या घरी नेले. तेथे नेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे सात लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे देतो, असे सांगून तेथून स्वतःची सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून बाळा वाघेरेला राहत्या घरातून ताब्यात घेतले. दरम्यान, बाळा वाघेरेची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.