न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२३) :- एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सवात महिलांसाठी ” हर घर दुर्गा ” या शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या शौर्यप्रशिक्षण वर्गामध्ये वय वर्ष ५ ते ५५ वयोगटातील सर्व महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणात स्व-संरक्षण, लाठी काठी, आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच योग यांचा समावेश आहे. यासाठी पिंपरी चिंचवड सिलंबम असोसिएशनचे सचिव विजय तेपुगडे मार्गदर्शक आहेत. हे शिबिर दि. ११ मार्च ते २० मार्च २०२३ पर्यंत सायं. ७ ते ९ पर्यंत पिंपरी गावातील, नवमहाराष्ट्र क्रीडांगणावर सुरू आहे.
या शौर्यप्रशिक्षण वर्गामध्ये ९३० हुन अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. या शिबिराचा समारोप सोमवारी (दि. २० मार्च) सायंकाळी ७ वाजता शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सवच्या वतीने करण्यात आले आहे.
















