न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याने गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलं आहे.
यासंदर्भात सरकारनं समिती नेमली आहे. ती समिती आधी आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक नवा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार तत्वत: जुन्या पेन्शन योजनेची संपकऱ्यांची मागणी स्वीकारण्यात आली. जुनी आणि नवी पेन्शन योजना यात मोठं अंतर होतं. यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल, त्यात अंतर राहणार नाही अशी भूमिका शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात कळवली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू होईल. ती निकोप होण्यासाठी समिती त्याबाबत विचार करेल”, अशी माहिती संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना दिली.
उद्यापासून महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावं. विशेषत: ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे, जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांना तातडीने कशी मदत मिळेल यासंदर्भात विशेष काम करावं. रुग्णालयात तुमच्या गैरहजेरीमुळे जी अडचण झाली असेल त्यावर अडचण निस्तरण्यासाठी तातडीने काम करावं, अशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विश्वास काटकर यांनी दिली आहे.