न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- गरजू रुग्णांसाठी लाभदायक ठरणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कागदपत्रांच्या कामकाजासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून मध्यस्थाची नेमणूक केली जाणार आहे. याबाबतची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
या योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दीड वर्षांत एक हजार ११२ करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. सन २०२० आणि २०२१ या कालावधीत या योजनेच्या माध्यमातून सुमारे चार हजार ४४२ जणांना आर्थिक दिलासा मिळाला. या योजनेचे सर्व कामकाज करोना काळापासून वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पडले. रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर, मानधनावरील कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. आता या योजनेच्या कागदपत्रांच्या कामकाजासाठी महापालिकेकडून मध्यस्थाची नेमणूक केली जाणार आहे. याबाबतची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
या योजनेत कान, नाक, घसा, कर्करोग, रेडीओथेरपी, त्वचा प्रत्यारोपण, जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखीम देखभाल, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, अस्थिरोग, पोट व जठार, कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक, बालरोग, प्रजनन व मूत्र रोग, मज्जातंतू विकृती, जनरल मेडिसिन, बालरोग वैद्यकीय, हृदयरोग, नेफ्रोलोजी, न्युरोलोजी, पल्मोनोलोजी, चर्मरोग, रोमेटोलोजी, इंडोक्रायनोलोजी, मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी, इंटरवेन्शनल रेडीओलोजी आदी १ हजार ३४ प्रकारांच्या सर्जरी केल्या जातात.
याबाबत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्याच्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी लागते. त्यासाठी मध्यस्थ नेमला जाणार आहे. त्याची निविदा तयार असून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. या योजनेचा जेवढ्या रुग्णांना लाभ होईल, तेवढे महापालिकेचे उत्पन्न वाढते. शासनाकडून महापालिकेला पैसे मिळतील. थेरगाव रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.